सण आणि उत्सव

उत्सव ( सण )

  • श्री क्षेत्र शनी शिंगणापूर येथे दररोज हजारो शनी भक्त दर्शनासाठी येत असतात. प्रत्येक शनिवारी तर अपूर्व , अलोट अशी सहस्त्र भाविकांची गर्दी दर्शनाचा लाभ घेतात.
  • प्रत्येक शनिअमावस्येला व दरवर्षी गुढी पाडव्याला लाखो भाविक दर्शनाचा लाभ घेतात व गावकरी हा सण सार्वत्रिक उत्सव म्हणून साजरा करतात.
  • श्री शनैश्वर जयंती हा विशेष दिवस श्री शनिदेवाचा जन्म दिवस म्हणून गावात ” श्री शनैश्वर जयंती महोत्सव “उत्साहानेसाजरा केला जातो.या निमित्ताने अखंड हरिनाम सप्ताह व संत तुकाराम गाथा पारायण सोहळा आयोजित केला जातो या दिवशी कावड व पालखी मिरवणूक केली जाते.
  • महंत उदासीमहाराज यांच्या पुण्यतिथी निमित्ताने प्रतिवर्षी चैत्र शुद्ध दशमी ते चैत्र वद्य प्रतिप्रदा अखेर अखंड हरिनाम सप्ताह व ग्रंथराज ज्ञानेश्र्वरी पारायण करण्यात येते. सप्ताहाच्या कालावधीत दररोज पहाटे ४ ते ५ काकडआरती , ५ ते ६ विष्णुसहस्त्रनाम, ७ ते ८ ज्ञानेश्र्वरी वाचन, दुपारी ३ ते ४ संगीत भजन , ४ ते ५ प्रवचन, ५ ते ६ हरिपाठ , व रात्री ८ ते ११ हरी कीर्तन व जागर असा दैनंदिन कार्यक्रम असतो.
  • दरवर्षी आषाढी एकादशीला श्री क्षेत्र शनी शिंगणापूर ते क्षेत्र पंढरपूर अशी श्री शनैश्वराची पालखी घेऊन पायी दिंडी सोहळा सन १९९१ पासून आजतगायत सुरु आहे. यात देवस्थानचे सर्व ट्रस्टी वइतर भाविक मंडळींचा समावेश असतो.
  • वरील सोहळ्याप्रमाणे दरवर्षी एकनाथी षष्ठीला श्री क्षेत्र शनी शिंगणापूर ते श्री क्षेत्र पैठण श्री शनैश्वराची पालखी घेवून पायी दिंडी सोहळा सन १९९१ पासून आजतागायत सुरु आहे. यातही शनी शिंगणापूरचे बरेसचे भाविक सहभागी होतात.

विशेष उत्सव

  • महंत उदासीमहाराज यांच्या पुण्यतिथी निमित्ताने प्रतिवर्षी चैत्र शुद्ध || १० ते चैत्र वैद्य || १ अखंड हरिनाम सप्ताह , ज्ञानेश्र्वरी पारायण सोहळा , हरी कीर्तन व समारंभ
  • प्रतिवर्षी आषाढी एकादशीला शनी शिंगणापूर ते पंढरपूर पायी श्री शनिदेवाची पालखी सोहळा.
  • प्रतिवर्षी संतनाथ षष्टी ला शनी शिंगणापूर ते पैठण पायी दिंडी सोहळा असतो

शनी अमावस्या

शनिवारी येणा-या अमावास्येला शनिअमावस्या म्हणतात. दर शनी अमावस्येला या ठिकाणी मोठी यात्रा भरते. वर्षातून २ किंवा ३ अमावस्या येतात. यावेळी लाखो भक्तगण दर्शनाचा लाभ घेतात. मध्यरात्रीपासून ते दुसरया दिवशीचे रात्री १२ वाजेपर्यंत दर्शनाला येणाऱ्या भाविकांची झुबंड उडते. देवस्थानच्या वतीने हया दिवशी एखाद्या मोठ्या पाहुण्यांच्या वा मंत्र्यांच्या हस्ते श्री शनिदेवाची महापूजा केली जाते. दर्शनार्थीचा स्त्रोत कायम चालू असतो. जवळ जवळ ८ ते १० लाख लोक २४ तासांत येतात. अलोट गर्दीमुळे सर्व भक्त चौथारयावर दर्शन करण्यापेक्षा खालूनच नमस्कार करून धन्यता पावतात.

शनी अमावस्येचं महत्त्व याकरिता आहे की सूर्याच्या सहस्त्र किरणांमध्ये प्रमुख किरण आहे. ” अमा”, अमा नावच्या मुख्य किरणाच्या तेजाने सूर्यदेव तिन्ही लोक ( स्वर्ग / मृत्यू / पातळ ) प्रकाशित करतो. प्रस्तुत अमा च्यातिथी विशेष तारखेला चंद्र निवास करतो म्हणून त्याचे नाव शनी अमावस्या होय. म्हणून अमावस्या प्रत्येक धर्मकार्याला अक्षय फल देणारी असते. पूर्वजांच्या श्राद्ध कर्मासाठी याचे विशेष महत्त्व आहे.

शनिजयंती

वैशाख वद्य अमावस्येस हा कार्यक्रम उत्साहाने साजरा केला जातो. याच दिवशी श्री शनैश्र्वर महाराजांची जयंती ( जन्म दीन ) उत्सव दिन म्हणून साजरा करण्यात येतो. प्रस्तुत उत्सवासाठी अनेक ठिकाणाहून नामवंत ब्राम्हणांना पाचारण केले जाते. एका लघुरुद्र अभिषेकाला ११ ब्राम्हण लागतात , व हा कार्यक्रम सुमारे २ || ते ३ तास चालतो. दिवसेंदिवस अभिषेकाचे प्रमाण वाढत चालले आहे. त्या प्रमाणात ब्राम्हणांच्या संख्येत वाढ करण्यात येते. सध्या ५५ ब्राम्हणांना बोलवावे लागते.

अभिषेकाचा कार्यक्रम सकाळी ७ ते संध्याकाळी ७ वाजेपर्यंत चालू असतो. शेवटी महापूजा होवून शनी महाराजांच्या पालखी मिरवणुकी नंतर शनिजयंती वद्य महापूजा महाआरती होम व महाप्रसाद वाटला जातो. प्रारंभी शनैश्र्वरच्या मूर्तीला पंचामृत, तेल व वाळ्याचे पाणी यांनी स्नान घालण्यात येते व नंतर शनैश्र्वराच्या नामघोषचा जल्लोषात रुद्राभिषेक घालण्यात येतो. यावेळी वातावरण अगदी दुमदुमून गेल्यासारखे वाटते. प्रसन्न व उत्साही वातावरणामुळे प्रत्येक भक्ताचे मन प्रफुल्लीत व टवटवीत राहते. प्रस्तुत काळात सर्वच भक्तगण आपल्या सर्व सांसारिक चिंता, व्यथा एकदम विसरून जातात. हा अपूर्व सोहळा पाहण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणाहून लाखो भक्तगण उपस्थित राहून शनि महाराजांच्या दर्शनाचा मनमुराद आनंद लुटतात. त्यामुळे हया दिवशी सुद्धा शनि शिंगणापूर मध्ये भव्य यात्रेचे स्वरूप प्राप्त झालेले असते. असे म्हणतात की शनि जयंतीला शनिमूर्ती निळसर रंगाची दिसते. त्यात मूर्तीला आंघोळ घातल्यावर श्री शनिदेवाला नौरत्न हार जो सोने, हिरे , जडजवाहीराने रत्नजडीत आहे असा हार घालतात.

प्रत्येक शनि जयंतीला देवस्थान चे विश्र्वस्त , भक्तगण ” सामाजिक सेवा दिवस ” रुपाने साजरा करीत असतात. याच दिवशी इतर ही अनेक सामाजिक कार्यक्रम उदा. – डोळ्याचे शिबीर , आरोग्य शिबीर , स्वातंत्र्य सैनिक किंवा शहीद जवानाच्या विधवा पत्नीचा सन्मान करून सामाजिक सेवा दिन या रुपाने हा यात्रा दिवस साजरा केला जातो.

गुढी पाडवा

भारतीय नववर्षारंभ दिवस म्हणजे चैत्र शु || प्रतिपदा .साडेतीन मुहूर्तापैकी हा एक मुहूर्त. प्रस्तुत दिवस म्हणजे नववर्षाभिंदन ! अशा हया चांगल्या मुहूर्तावर आपल्यावरील संकट निवारण करण्यासाठी या जागृत दैवताच्या लाभ अनेक भक्त घेतात. या दिवसाचे वैशिष्ट्य असे की प्रत्येक भक्त या सुमुहूर्तावर श्री शनिदेवाचे गंगोदाकाचे स्नान घालतात. हे गंगोदाक बहुधा प्रवरा व गोदावरीच्या संगमावरून आणतात. हे गंगोदक आणण्यासाठी लोक एकत्र येऊन समुहाने पायी जातात त्यालाच कावडीने गंगा आणणे असे संबोधतात.

प्रस्तुत परिसरात खूप भक्तगण कावडीला जातात. जाताना सर्वजण एकाच समुहाने जात नाही. आजूबाजूच्या प्रत्येक गावाचा १ – १ समूह असतो किंवा प्रत्येकजण आपआपल्या सोयीने समुहात सामील होण्याचा प्रयत्न करतो. जे भक्त कावडीने गंगा आणतात त्यापैकी बहुतेकांच्या कावडी या नवसपुर्तीच्या असतात. काही जन भक्तीभावाने गंगोदक आणण्यासाठी जातात. शिंगणापूरच्या प्रत्येक घरातून कमीत कमी १ व्यक्ती तरी कावडीला जाते. पवित्र गंगोदक हे गोदावरी आणि प्रवरेच्या संगमावरून म्हणजे ” कायगाव टोका ” हे अंतर ४२ की. मी. असून पायी अनवाणी कावड आणावी लागते. पाणी आणताना कोणत्याही साधनांचा , वाहनाचा वापर करावयाचा नसतो. जर कोणी साधनाचा वापर केला तर त्यास लगेच चमत्कार पहावयास मिळतो. यात एक वैशिष्ट्य असे की प्रस्तुत कावड आणण्याचा कार्यक्रमासाठी ४२ की.मी. पायी चालत येवून सुद्धा कुणालाही कसला त्रास होत नाही की रस्त्यात कधी कुणाला अपघात झाल्याचे ऐकले नाही.

संगमावरून आणलेल्या कावडी गावाच्या बाहेर एका बाजूस थाबंतात. सकाळी नऊच्या सुमारास गावातील सर्व लोक कावडी आणण्यासाठी जातात. मिरवणुकीच्या सुरवातीला बँड़ पथक नंतर भगवे ध्वज असलेले वारकरी व त्यांच्या मागे टाळ मृदुंग वीणेच्या तालावर नाचणारे भजनी मंडळी असतात. यात उदासिबाबांची प्रतिमा व भक्तगण असतात. सर्व कावडीवाल्यांच्या पाण्याने देवाला स्नान घातले जाते. सर्व कावडीचे पाणी मूर्तीवर टाकण्यासाठी पूर्ण चौथरा धुवून स्वच्छ केला जातो.गंगोदक मूर्तीवर टाकताना चौथऱ्यावर कुणालाही प्रवेश दिला जात नाही असे हे पवित्र गंगोदक कावडी ने गुढीपाडवा व शनि जयंती उत्सवानिमित्त आणले जाते.

प्रस्तुत सोहळा पाहण्यासाठी लांब लांब चे लोक येतात. यात गरीब-श्रीमंत , खेडूत-शहरी, अबाल – वृद्ध , सुशिक्षित – अशिक्षित असे अनेक प्रकारची लोक जमतात. यामुळे यात्रेचे स्वरूप प्राप्त होते. येथील या यात्रेचे वैशिष्ट्य म्हणजे स्त्रियांचे अनेक प्रकारचे कृत्रिम अलंकार, लहान मुलांची खेळणी दुकाने , उपहारगृहे , रसवंती , फराळाची दुकाने वगैरे सजवलेली असतात. नवसपूर्ती चे भंडारे असतात. ते कावडीच्या लोकांना प्रसाद म्हणून जेवू घालतात.

ठिकाण

श्री शनैश्वर देवस्थान, शनी शिंगणापूर,
पोस्ट : सोनई, तालुका : नेवासा, जिल्हा : अहमदनगर
पिनकोड : ४१४ १०५. महाराष्ट्र , भारत.

गुगल नकाशा