सर्पदंश

अनेक अनुभवांनी हे सिद्ध झाले आहे की ज्याप्रमाणे आई – वडील संकटात सापडलेल्या आपल्या मुलांना वाचवत असतात त्याचप्रमाणे परमेश्वर सुद्धा आपल्या भक्तांना प्रत्यक्ष – अप्रत्यक्ष मदत करीत असतो. तसे पाहिले तर मानवाचे जीवन हे अनेक संकट व विपत्तीने ग्रासलेले असते. तशात मनुष्य हा मार्ग काढीत असतो. भक्तांच्या मनात ईश्वराबद्दल अगाध श्रद्धा व प्रेमभाव असतो. असे शेकडो उदाहरणे आपणास पहावयास मिळतात. श्री शनिदेवाच्या कृपेनेच शनि शिंगणापूर भारतातील एक नामांकित तीर्थक्षेत बनलेले आहे.

शनि शिंगणापूर गावाच्या चारही बाजूला शेती असल्यामुळे साप असणे स्वाभाविकच आहे. अन् त्याला चुकून जरी धक्का लागला तरी तो चावणे स्वाभाविकच आहे. परिसरात जर कुणाला सर्पदंश झाला असेल त्या व्यक्तीला श्री शानिदेवाजवळ आणून ठेवतात. अर्थात शुद्धतेचे पथ्य पाळून त्या व्यक्तीच्या अंगावर पांढरे कपडे ठेवतात. ज्याला सर्पदंश झालेला असेल त्याच्या पुरुष नातेवाईकाने स्नान करून ओल्या वस्त्रात देवास पाणी वाहून ते देवाचे तीर्थोदक सर्पदंश व्यक्तीला पिण्यासाठी देतात. असे अनेक किस्से पहायला. ऐकायला येथे मिळतात. श्री शनीदेवा वर ग्रंथ लिह्ण्याच्या निमित्ताने मी येथे आलो, काही लोकांना भेटलो, तेव्हा त्यांनी जे काही सांगितले ते पुढीलप्रमाणे –

शनि शिंगणापूर मधील श्री दगडू रामा साबळे यांची मातोश्री रात्रीच्या वेळेस बाहेर निघाल्या असता बाहेर त्यांना अचानक अंधारात सर्पदंश झाला. घरी आल्यावर घरच्यांना “चावला – चावला” सांगे पर्यत बेशुद्ध पडल्या. तेव्हा लोकांनी उचलून श्री शानिदेवाजवळ नेले. तीर्थोदक पाजले , श्री शनिदेवाचा नामघोष चालू केला. १-२ तासातच ती शुद्धीवर आली. बोलूचालू लागली.

सोनई येथील सुनबाई शेजारच्या घरी काही पदार्थ घेवून जात असतांना रस्त्यातच तिला सर्प दंश झाला. घरी येऊन घडलेली सर्व हकीकत घरच्यांना सांगत असतानाच ती बेशुद्ध पडली. घरच्यांनी उचलून शनि शिंगणापूरला श्री शानिदेवाजवळ आणून ठेवले. लोकांनी तिला तीर्थोदक पाजले. रात्रभर श्री शनिदेवाचा नामघोष चालू ठेवला. पहाटे पाच वाजता ती शुद्धीवर आली व नंतर घरी चालत गेली.

स्थानिक सीताबाई काशिनाथ दरंदले यांना सर्प दंश झाल्यावर सीताबाई रात्रभर लिंबाच्या पाल्यात राहिली, काय चमत्कार सकाळी ठीक होऊन घरी गेली. येथे अशी पण चर्चा आहे की केवळ स्त्री – पुरुषच नाही तर पाळीव प्राणी गाय, बैल , म्हशी यांना जरी सर्प दंश तर त्यांना इथे आणून आधी कथन केल्या प्रमाणे प्रक्रिया करतात, नंतर तीच जनावरे चांगली होऊन चालायला लागतात

ठिकाण

श्री शनैश्वर देवस्थान, शनी शिंगणापूर,
पोस्ट : सोनई, तालुका : नेवासा, जिल्हा : अहमदनगर
पिनकोड : ४१४ १०५. महाराष्ट्र , भारत.

गुगल नकाशा