प्रस्तुत तीर्थक्षेत्र श्री गुरुदेव दत्ताचे आहे. जे शनी शिंगणापूर पासून ४१ कि. मी. वर आहे. नेवासा या तालुक्याच्या गावापासून १४ कि. मी. दूर मुरमे गावाच्या उंचावर हे देवस्थान आहे. भूनंदनवन श्री क्षेत्र देवगड परिसरातील प्रमुख मंदिर म्हणजे श्री दत्त प्रभूंचे मंदीर आकर्षक नक्षीकाम, दगडी बांधकाम, संगमरवराचा कल्पक आणि योग्य वापर, चार फुट उंचीचा भव्य सुवर्ण कळस आणि सात्विकतेची प्रचिती देणारी रंगसंगती हि हया क्षेत्राची वैशिष्ट्ये होय. या सर्व वैशिष्ट्यांना पावित्र्य देणारी श्री दत्त प्रभूची लोभस मूर्ती या मंदिराचे खरे वैभव आहे. मंदिरात प्रवेश करताच दृष्टीस पडणारी स्वच्छता पावित्र्य जपण्याचा केलेला आटोकाट प्रयत्न आणि संतजनांच्या सहवासाने मंदिर सभागृहाला लाभलेली अध्यात्मिक श्रीमंती या मंदिराच्या आकर्षणाचा महत्वाचा भाग होय. हरिनामाच्या गजराने पावन झालेला मंदिराचा प्रत्येक कोपराच जणू या गजरात आपला आवाज मिसळून परमात्म्याला आळवतो आहे असे वाटतो.
श्री क्षेत्र देवगड परिसरात श्री दत्त मंदिराच्या डाव्या बाजूस समर्थ सदगुरुंच्या इच्छेनुरूप पंचमुखी श्री सिध्देश्वराचे मंदिर आहे. या मंदिरात सत्य संकल्प सिद्धीला नेणाऱ्या श्री सिध्देश्वराचे , श्री गणेशाचे, श्री कार्तिक स्वामींचे आणि माता पार्वतीचे दर्शन होते. मंदिराच्य सुरवातीस समोर येणारे गोपुर हे या मंदिर परीसराचे वैभव वाढविणारे आहे. प्रवेशावरचा दगडी घाट, नदी किनाऱ्यावरील वनराई, नौका विहार करता येईल असे विस्तीर्ण पात्र आणि मंदिर परिसराशी मैत्री वाढविण्यात मंदिराच्या पायथ्या जवळून जाणारा प्रवरेचा प्रवाह हा आध्यत्म आणि निसर्गाचा अनोखा संगम देवगडला पाहता येतो.