अनुभव

आपण कधी ही श्री शनिदेवाच्या दर्शनाला जा प्रत्येक वेळेला वेगळी अनुभूती मिळते. पृथ्वीवर अशी ही एकच जागा उपलब्ध आहे.जी प्रेरक व दर्शनीय होय. इथे आल्यावर असे लक्षात येते की मनुष्य एक – दुसऱ्याच्या संपत्तीकडे वाईट नजरेने पहात नाही. पैसा , सत्ता साठी धडपडण्याचे वातावरण येथे नाही, म्हणून हे अदभूत स्थान आहे. देव आहे पण देऊळ नाही. सर्व जाती – धर्मासाठी खुले देवालय. तसेच मी प्रत्यक्षात घेतलेल्या अनुभवा वरून येथील ट्रस्टी, पदाधिकारी यांना भेटलो असता ते सर्वच्या सर्व स्वभावाने गरीब, विनम्र , सरळ व सेवाभावी – त्यागी आहेत याचा मनस्वी आनंद होतो.

प्रस्तुत देवस्थानाच्या संदर्भात मला अधिक माहिती जाणून घ्यावयाची होती म्हणून मी दि. १८ फेब्रुवारी २००४ रोजी येथील विश्र्वस्तांना भेटावयास गेलो. पहिल्याच भेटीत मी खूपच प्रभावित झालो. विशेष असे की त्यांनी लगेच मला सांगितले की………..

राजस्थानमधील भिलवाडा जवळील ” मकरना ” गावी आम्हाला मंदिरासाठी काही देवांच्या मूर्ती घेण्यासाठी श्री बानकर भाऊ बरोबर जायचे होते. डिंसेबर १९९० मधील ही गोष्ट आहे आमच्या जवळ ४ लाख रुपयांची रोकड होती. चंबळ घाट लागायच्या अगोदर एका हॉटेलवर आम्ही थांबलो. चहा घेताला अन् तेथील एका वेटरला विचारले की, घाट किती लांब आहे ? काही भीती आहे का, बर केव्हा पोहचू वगैरे वगैरे. मोकळ्या मनाने आम्ही त्याला हेही सांगितले की आमच्या जवळ रोकड आहे.

हे ऐकताच त्याने रात्री आम्हाला घाट चढावयास मनाई केली, लुटण्याची भीती दाखविली, पण शेवटी आम्ही विचार केला की आता यांना पण कळले आहे आपल्याजवळ रोकड आहे तेव्हा धाब्यावर थांबलो तर हे चोरणार, वर गेलो तर दुसरे लुटणार तर चला हा पैसा मुळात श्री शनिदेवाचा आहे, याची रक्षा तोच करणार. असे म्हणून आम्ही निघालो.

आमची जीप निघाली, मागे व पुढे कोणतीही गाडी नव्हती, सर्वांना भीती वाटत होती चंबळ खोऱ्याची, परंतु आश्र्चर्याची गोष्ट अशी की आमची गाडी घाटातून जशी सुसाट निघाली तेव्हा आमच्या गाडी बरोबर काळ्या घोड्यावर सवार एक घोडेस्वार बरोबर आमच्या समांतर घोडा चालवत होता. आम्हाला वाटलं तो पण आमच्या सारखाच असेल. पण सकाळी जेव्हा घाट संपला अन् आम्ही गाडीच्या बाजूला पाहतो तर घाट संपताच घोडा ही गायब. तेव्हा आम्हाला पक्की खात्री झाली की ते घोडेस्वार श्री शनिदेव महाराजच होते, जे आमच्या रक्षणासाठी घाटात बरोबर होते.

ऐंशी वर्षे वयाचे श्री अप्पासाहेब यशवंत दरंदले यांना श्री शनिदेवाच्या चमत्कारा संदर्भात म्हणून जेव्हा भेटावयास गेलो तेव्हा त्यांनी सांगितले की – आमच्या गावात काही परिवार राहतात, बाकीचे मळ्यात, शेतीत वस्ती करून राहतात. आमचे स्थानिक श्री किसन शेटे यांच्या घरात रात्री चोर घुसले. चोरी केली पण माल घेवून जेव्हा घराच्या बाहेर पडले तर तेआंधळे झाले, काय करणार चालता येईना त्यांना सकाळी पकडले गेले.

शनि शिंगणापूर मधील एकाने मला दि. १५ फेब्रुवारी २००४ ला भेटल्यावर मळ्यात सांगितले की – में १९७२ मधील गोष्ट आहे, आमच्या शेजारच्या साबळेंच्या घरी रात्री चोर आले होते. त्यांच्या मोकळ्या घरात मडके गाडगे होते. त्यांच्याकडे जे काही थोडं फार सोनं – नाणं होते ते त्यांनी मडक्यातच ठेवले होते. चोरांनी सर्व घर धुंडाळले, मडके उतरून पाहिले , पण त्याच मडक्यातील माल त्यांना सापडला नाही. माल शोधता – शोधता सकाळ झाली आणि ते पकडले गेले.

विज्ञान युगात चोरंपासून रक्षण करण्यासाठी वेगवेगळ्या कंपन्याची वेगवेगळी स्टेनलेस स्टीलची कपाटे , त्यात विविध चोर कप्पे, कुलुपे, शटर्स, लोकार्स इत्यादी चा शोध लागलातरी सुद्धा चोर त्या ठिकाणी चोरी करून सापडत नाही. परंतू श्री शनिदेवाच्या परिसरात अद्याप चोरी नाही, ज्याने केली त्याला चमत्कार ही दिसला. परिसरात चोरी करणारा अंध होऊन किंवा भ्रमिष्ठ होऊन रस्ता चुकून मंदिराच्या आसपास फिरत राहतो. चोराने स्वतः गुन्हा कबूल करून देवाजवळ क्षमेची याचना केली तर चोर श्री शनिदेवाच्या कृपेने पूर्ववत होतो.

काही चोर शनि शिंगणापूरला असेच चोरी करण्यासाठी आले होते. त्यांनी येथील पोलीस पाटलाची एक पांढरी खिलारी बैल जोडी चोरून शनि शिंगणापूर सोडून जाण्यास निघाले. त्या चोरांनी रात्रभर प्रवास केला. मग त्यांना वाटले आपण गावापासून २५ – ३० की. मी. अंतर चालून आलो. प्रवास केला म्हणून ते थकले. झोप घ्यावी म्हणून त्यांनी खिलारी जोडी एका झाडाला बांधून झोपले. सकाळी उठून बघता ते शनि शिंगणापूरातच होते. बैलजोडी सह ते सकाळी श्री शनीदेवापुढे आले , ग्रामस्थांसमोर व देवापुढे चूक कबुल करून माफी मागितली. गावकऱ्यांनी त्यांना जेवण देऊन , फेटे बांधून घरी पाठविले

ठिकाण

श्री शनैश्वर देवस्थान, शनी शिंगणापूर,
पोस्ट : सोनई, तालुका : नेवासा, जिल्हा : अहमदनगर
पिनकोड : ४१४ १०५. महाराष्ट्र , भारत.

गुगल नकाशा