साक्षात्कारी स्वयंभू मूर्ती

श्री शनिदेवाची लोखंड व दगडयुक्त दिसणारी काळी – सावळी ५ || फुट उंच व १ || फुट रुंद दिसणारी मूर्ती , जी बाहेर खुल्या अंगणात उन , वारा , पाऊस , थंडीत रात्रदिंवस राहणाऱ्या या मूर्तीच्या संदर्भात येथील स्थानिक नागरिकांनी मला जे सांगितले ते फार विचित्र व अदभूत वाटते. एके दिवशी गावात मुसळधार पाऊस झाला. पाऊस इतका पडला की समोरचे सुद्धा नीट दिसत नव्हते. म्हणे भागातील संपूर्ण शेती वरून पावसाचे , पुराचे पाणी वाहत होते. कुणी कल्पनाच करू शकत नाही की एवढा जोरात पाऊस झाला असावा. परिणामी या गावाच्या आजूबाजूला पूर आला. गावाच्या शेजारीच ” पानासनाला ” आहे. हया नाल्याला महापूर आला. प्रस्तुत महापुरातच एक मूर्ती वाहून आली. मूर्ती बोरीच्या झाडाला अडकली होती. ही घटना गावापासून फारच जवळ म्हणजे १५० मीटर अंतरावर पूर ओसरल्यावर गुराखी मुले गुरे चरण्यासाठी पानासनाल्याच्या काठी होतेच. त्यांचे अचानक लक्ष बोरीच्या झाडाला अडकून राहिलेल्या मूर्तीकडे गेले. ती भली मोठी मूर्ती पाहून मुलांना खूप आश्र्चर्य वाटले. त्या गुराखी मुलांमधील स्वाभाविक प्रवृत्ती जागी झाली. उत्सुकतेपोटी त्यांच्या हातात असलेल्या काठीने त्यांनी मूर्ती डीवचण्यास सुरवात केली. त्यातील एका गुरख्याने आपल्या हातातील काठी मूर्तीला जोरात टोचली. आश्र्चर्य असे की टोचलेल्या जागेतून आपोआप रक्तस्त्राव होऊ लागला. त्या ठिकाणी व्रण पडला. तोच व्रण अद्याप ही मूर्तीवर पहावयास मिळतो. मूर्तीतून रक्तस्त्राव पडताच गुराखी मुले घाबरली व गुरे तेथेच सोडून गावाकडे पळाली. गावात जाऊन त्यांनी घडलेला प्रकार वडीलधाऱ्या माणसांना सांगितला. हां – हां म्हणता वरील खबर संपूर्ण गावात पसरली. घडलेला चमत्कार पाहण्यासाठी गावातील सर्व लहान मोठी मंडळी धावतच त्या मूर्तीजवळ गेले व त्यांनी तो चमत्कार प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहिला. हया चमत्कारात बराच वेळ गेला. तो पर्यंत सांयकाळ झाली होती. गावकऱ्यांना हे दृश्य पाहून काही निर्णय घेता येईना. म्हणून आता सकाळी बघू असे म्हणून जमलेली सर्व मंडळी आपापल्या घरी परतली. परंतु सर्वांच्या मनात रात्रभर पाहिलेल्या त्या चमत्कारचे कुतूहल निर्माण झाले.

त्याच रात्री योगायोगाने चमत्कार पाहण्यासाठी आलेल्या एका भक्ताच्या स्वप्नात श्री शनीदेवांनी दृष्टांत दिला व असे सांगितले की, ” काल तुम्ही गावकऱ्यांनी , गुराख्यांनी जे पाहिले ते सर्व सत्य आहे “.”आपण कोण आहात ? ” – भक्त ” मी साक्षात श्री शनिदेव आहे , काल तुम्ही मला जिथे पाहिले तेथून मला उचला आणि गावात माझी स्थापना करा. ”

हया भक्ताची झोप उडाली, त्याने स्वप्नात पाहिलेला दृष्टांत गावातील लोकांना कथन केला व त्यानुसार सर्वजण बैल गाडी सह त्या मूर्तीजवळ गेले. अनेक लोकांनी ती मूर्ती बैलगाडीत उचलून ठेवण्याचा प्रयत्न केला. पण व्यर्थ ? ती मूर्ती जराही जागेवरून हालत नव्हती . आता काय करावे ? शेवटी हताश होऊन मूर्ती आणावयास गेलेले लोक घरी परतले. दुस-या दिवशी त्याच भक्ताच्या स्वप्नात शनि महाराजांनी पुन्हा दृष्टांत दिला. …….” बेटा , काल तुम्ही लोकांनी मला उचलण्याचा प्रयत्न केला, पण कुणीही दोन व्यक्ती नात्याने सख्खे मामा-भाचे असलेल्यांनी मला बोराटीच्या काट्याच्या फासावर ठेऊन दोन काळ्या रंगाचे बैल ते सुद्धा नात्याने सख्खे मामा-भाचे असलेल्या जोडीने मला घेऊन जावे. तिथे माझी प्राणप्रतिष्ठा देखील सख्खे मामा-भाचे यांनीच करावी.”

लगेच सकाळी भक्ताने ही सर्व माहीती गावकऱ्यांना सांगितले. त्या प्रमाणे काळी बैलजोडी व बोराटीच्या काट्यांच्या फासावर मामा भाच्यांनी ती मूर्ती उचलून ठेवली. जी मूर्ती अगोदर अनेक लोकांकडून उचलली जात नव्हती तीच मूर्ती दृष्टांताप्रमाणे मामा-भाच्यांनी स्पर्श करताच सहज उचलून लोटल्यावर बोराटीच्या काट्यांच्या फासावर चढविली गेली व दृष्टांताप्रमाणे मूर्तीला आणले.

मानवी प्रवृत्तीचा एक प्रसंग इथे फार बोलका आहे. ज्या भक्ताच्या स्वप्नात दृष्टांत झाला त्याची तीव्र इच्छा होती की मूर्तीची प्राणप्रतिष्ठा आपल्या जागेत करावी. सर्व प्रयत्न करून सुद्धा ज्या ठिकाणी सध्या मूर्ती आहे त्या जागेवरून मूर्ती तसूभरही हालली नाही. त्या भक्ताची अभिलाषा व्यर्थ ठरली. सर्वानुमते सध्या मूर्ती जिथे आहे त्याच ठिकाणी मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करावी लागली. त्याच वेळी लोकांना श्री शनिदेवाचा चमत्कार दिसून आला.

बऱ्याच दिवस ती मूर्ती जमिनीवर साध्या चौथ-यावर उभी होती. सभोवताली आता चकाकतो तसा दगडी चौथरा नव्हता. सोनई ता.नेवासा गावातील श्री लोढा शेटजींना बऱ्याच दिवसापासून मुलबाळ होत नव्हते. त्यांनी श्री शनिदेवाला नवस कबूल केला जर आपल्याला संतान प्राप्ती झाली तर आपण मूर्तीच्या सभोवताली चौथरा बांधू. काळाचा महिमा पण कसा असतो बघा काही महिन्यांत शेटजींची मनोकामना पूर्ण झाली व त्यांनी देवाच्या सभोवताली चौथरा बांधून पूर्ण केला.

प्रस्तुत काळात सुद्धा एक गमतीची गोष्ट घडली. चौथ-याचे काम चालू असताना काही बुजुर्ग मंडळींनी सल्ला दिला की, मूर्तीला उचलून बाजूला करा, व मग काम सुरु करा, ज्यामुळे सुलभता निर्माण होईल, ठरल्याप्रमाणे चौथरा बांधून मूर्ती उचलून वर ठेवावी म्हणून मूर्ती जमिनीतून वर काढण्यासाठी खटाटोप सुरु केला. पण लक्षात असे आले की , मूर्ती जितकी उंच आहे तितकीच किंबहुना त्याच्यापेक्षा जास्तच खोल खणले तरी सुद्धा मूर्ती तितकीच खोल अखंड स्वरुपात आत खोल असल्याचे आढळून आले.

तदनंतर मूर्तीच्या चौफेर ३ फुट उंचीच चौथरा बांधण्यात आला. तरी सुद्धा मूर्तीची उंची पूर्वी इतकीच आहे अलीकडेच श्री शनैश्वर देवस्थान शनी शिंगणापूर ता. नेवासा देवस्थानन चौथऱ्या मध्ये बरीच सुधारणा केलीली आहे. परंतु मूर्तीच्या उंचीत काहीच फरक पडलेला दिसत नाही.

ठिकाण

श्री शनैश्वर देवस्थान, शनी शिंगणापूर,
पोस्ट : सोनई, तालुका : नेवासा, जिल्हा : अहमदनगर
पिनकोड : ४१४ १०५. महाराष्ट्र , भारत.

गुगल नकाशा